मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा दिवस: राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर उपसमितीची तातडीची बैठक

मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा दिवस: राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर उपसमितीची तातडीची बैठक


मुंबई | – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल झाला असून आरक्षणाच्या मागणीला वेग मिळत आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर उपसमितीची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. काही महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी देखील बंगल्यावर पोहोचले आहेत.

सदर बैठकीनंतर सदस्य मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके यांनीही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर भेट दिली आहे. त्यामुळे या बैठकीतून कोणता तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


Comments